नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी योग्य प्रकारे संवाद साधत नाही..

पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील पंचायत समिती येथील कथित भोंगळ कारभार आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरांविरोधात पिंपळगाव खुर्द येथील विष्णू राणे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दि.17 जुलै रोजी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी योग्य प्रकारे संवाद साधत नसून, अर्जांवर वेळेत कार्यवाही केली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. तसेच घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध असतानाही लाभार्थ्यांचे हप्ते का थांबविण्यात येत आहेत, रोजगार हमी योजनेचे हप्ते मंजूर झाल्याचे सांगितले जात असताना लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा का होत नाही, तसेच गोठा, विहीर, कांदा चाळ, फळबाग आदी मनरेगा योजनांमध्ये विलंब का होत आहे, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, घरकुल लाभार्थ्यांचे फोटो व जीओ-टॅगिंग झाल्यानंतरही हप्ते न मिळणे, जीओ-टॅगिंगसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप, तसेच केवायसी प्रक्रियेसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.




































