भुसावळला स्थानिक गुन्हे शाखेची मध्यरात्री कारवाई ; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ : (निलेश के.फिरके) गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अमीर उर्फ अमीर बॉक्सर बरकत अली (वय २१, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
ता. २६ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार स्था. गु. शा. पथकाने ही कारवाई केली. पथकातील गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न. १५८/२६ अन्वये भा.दं.वि. कलम १८९, १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२)(३) तसेच आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी अमीर बॉक्सर हा फरार होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्याला रात्री अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
कारवाई दरम्यान आरोपीकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सपोउपनिरी.मंगेश जाधव करीत आहे.



































