भुसावळ – आगामी बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी भुसावळ तालुका पोलिसांकडून मंगळवारी सायंकाळी साकेगाव व निंभोरा बु. परिसरात दंगा काबू योजना आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
मंगळवार दि. २७ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हा रूट मार्च काढण्यात आला. साकेगाव येथे मरिमाता चौक, भवानीनगर, पोळा मैदान, पटेल गल्ली मार्गे पुन्हा मरिमाता चौकापर्यंत पोलिसांनी पायी फेरी काढून नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
तसेच निंभोरा बु. येथे गैबन शाह वाली बाबा दर्गा, ग्रामपंचायत, शिवाजीनगर, सर कॉलनी आणि चेतन हॉटेल परिसरातून रूट मार्च घेण्यात आला.
या उपक्रमात पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, १५ पोलीस अंमलदार तसेच २५ होमगार्ड सहभागी झाले होते. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी हा उपक्रम राबविला.




































