भुसावळ – शहरातील वाळ्मिक नगर परिसरात अज्ञात इसमांनी एका ऑटो रिक्षाला आग लावून जाळल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. या घटनेत सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम राजेंद्र बोयत (वय २३, रा. वाळ्मिक नगर, भुसावळ) हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांची बजाज कंपनीची एमएच-१९-सीडब्ल्यू-७२०९ क्रमांकाची रिक्षा ही घरासमोर उभी होती.
२७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे २.४४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर रिक्षाला आग लावली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या घटनेत रिक्षेचे अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




































