विधानसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांना मिरवणूकीस पोलिसांनी बंदी घातली आहे. उमेदवार यांचे कार्यालय, निवासस्थाने या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येईल.

पोलीस वार्ता, नाशिक: राज्यातील 288 मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिक शहरात निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मतमोजणीच्या प्रक्रियेतील संभाव्य तणाव आणि अनुशासनाच्या बाबींचा विचार करून सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका आणि जल्लोषाच्या प्रदर्शनामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रभावित होऊ शकते. यामुळे, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुशासन कायम राखण्यासाठी पोलिसांनी ही बंदी लागू केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. मतमोजणी केंद्रांसह संबंधित मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुचित घडामोडी टाळण्यासाठी नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील 11 मतदारसंघांमध्ये 1400 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 9 उपअधीक्षक, 32 निरीक्षक, शीघ्रकृती दल व इतर विशेष पोलिस दलाची तुकडी समाविष्ट आहे. मतदान यंत्र असलेल्या स्ट्राँग रूमच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अटींनुसार विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे या संदर्भात अद्याप कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.
पक्ष उमेदवार, अपक्ष उमेदवार यांचे कार्यालय, निवासस्थाने या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येईल. विजयी उमेदवारांना शहरातही मिरवणूक काढण्यास बंदी असून, नाशिक मध्य-पूर्व-पश्चिम आणि देवळाली संघात दि.23 नोव्हेंबर शनिवारी रोजी पोलिसांकडून राऊंड मारून लक्ष ठेवणार आहे.


























