भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..

पोलीस वार्ता, जळगाव : यावल तालुक्यातील पाडळसे गाव परिसरात वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी दि.15 जुलै रोजी पहाटे भोरटेक गावाजवळ एका पाळीव गुरांच्या गोठ्यावर वाघाने हल्ला करून एका म्हशीला ठार केले आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वाघाच्या हल्ल्याची भीती वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाडळसे आणि आसपासच्या शिवारात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा दावाही केला होता. मात्र, मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघाचा वावर निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. शेतात एकटे जाण्यासही नागरिक घाबरत आहे, कारण वाघ मानवी वस्तीजवळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला कळविल्याने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वनक्षेत्रपाल यावल पूर्व एस.एम पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डोंगरकठोरा आय.ए.एस तडवी, फैजपूर अतुल तायडे, गस्तीपथक आर.एम जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, आय.बी चव्हाण, चालक वाय.डी तेली घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाकडून वाघाच्या पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






































