भुसावळ – शहरातील खडका चौफुली पुल परिसरात मध्यरात्री गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वारांना अडवून बेदम मारहाण करत ११ हजार ८०० रुपयांची जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, आणखी दोन साथीदारांचा कसून शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश दिपक तायडे (वय २५, रा. कंडारी महादेव टेकडी) व त्यांचा मित्र राकेश गणेश सोनवणे हे ८ जुलैच्या मध्यरात्री जळगावहून मुक्ताईनगरकडे दुचाकीने निघाले होते. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान खडका चौफुली पुलाजवळ दोन दुचाकींवर आलेल्या चार तरुणांनी त्यांची दुचाकी आडवी लावून त्यांना जबरदस्तीने थांबवले.
त्यानंतर आरोपींनी गावठी कट्टा व धारदार चाकू रोखून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गणेश तायडे यांच्या खिशातील ११ हजार रुपये आणि राकेश सोनवणे यांच्या खिशातील ८०० रुपये, असे एकूण ११ हजार ८०० रुपये जबरदस्तीने हिसकावून आरोपी क्षणार्धात पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) आणि खुशाल शिवदास रूम (वय २०, रा. गडकरी नगर, भुसावळ) यांना अटक केली. केशव भालेराव याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे मध्यरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



































