(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले)
भुसावळ (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू भुसावळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील खंडवा येथील उमेश वर्मा (वय ४२) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (११ ऑगस्ट) करण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीच्या पुढील जनरल कोचमधील पुढील दरवाजाजवळच्या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये उमेश वर्मा आढळून आला. त्याच्याकडे असलेल्या मरून रंगाच्या कापडी ट्रॉली बॅगवर ‘LAVI SPORT’ असे इंग्रजीत स्टिकर होते.
पोलिसांनी पंचांसमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये ‘Tulsi Royal Zafrani Zarda’चे १२० पाउच आढळले. प्रत्येक पाउचची किंमत २२५ रुपये असून त्यांची एकूण किंमत २७ हजार रुपये आहे. तसेच ‘Premium Rajnigandha’चे ३२ बंडल आढळले. प्रत्येक बंडलमध्ये दोन पट्ट्या, अशा एकूण ६४ पट्ट्यांमध्ये प्रत्येकी २६ नग होते. एकूण १ हजार ६६४ नगांची किंमत ३३ हजार २८० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.
अशाप्रकारे बॅगेतून एकूण ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व त्यासोबत मिश्रित करण्यात येणारी सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. त्यातील नमुने रासायनिक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सदर मुद्देमाल पंचांसमक्ष उमेश वर्मा याच्या ताब्यातून पुराव्याकामी जप्त करण्यात आला.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस व आरपीएफच्या पथकाने संयुक्तपणे केली. पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहेत. कारवाईत एएसआय नितीन पाटील, धनराज लुले, जय कोळी, विलास जाधव, बाबू मिर्झा, अंकुश लांडगे तसेच रेल्वे सुरक्षा बल विभागाचे एएसआय शिवानंद गीते व दीपक तायडे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, जप्त मुद्देमालाची पुढील तपासणी सुरू असून, या प्रकरणात संबंधित कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.



































