तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली..

पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात, तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांनी गुरुवारी दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. यावेळी चार महिलांची सुटका या व्यवसायातून पोलिसांनी केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकलूद येथील संशयिय महिला मनीषा प्रकाश झोपे (वय-45) ही सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संबंधित ठिकाणी आधी बनावट ग्राहक पाठवून, मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतरच सर्व पोलीस पथकाने त्या ठिकाणी घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान दुमजली घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली.
यातील तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला भुसावळ येथीलच असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपी महिला मनीषा झोपे हिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलिसांकडून सुरू आहे.




































