रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते..

पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील अंकलेश्वर महामार्गावर असलेले चौक, समृद्धी महामार्गाला जोडणारे छत्री चौक, बनाना सिटी चौक हे दिवसेंदिवस अपघातांचे केंद्र बनत चालले आहे. मात्र याकडे फैजपुर-सावदा पोलीस ठाण्याचे आणि नगरपरिषद अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
या चौकांमध्ये रिक्षा चालकांची मनमानी व दादागिरी पहायला मिळते. रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते. यामुळे रस्त्यावर रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सावदा-फैजपूर हे दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून प्रांत कार्यालय, जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय हे फैजपूर शहरात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ होत असते. परंतु रिक्षा चालक पेसेंजर मिळवण्यासाठी या रस्त्यांवर स्पर्धा करत असताना दिसतात. फैजपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यापार मोठ्या प्रमाणावर असून वाहनांची देखील वर्दळ सतत असते. तरी या रस्त्यावर शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांना पोलिसांनी आवार घालण्याची तसेच त्यांच्या रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.




































