टप्पा-२च्या जलकुंभाचे भूमिपूजन; ८० टक्के काम पूर्ण, टप्पा-१ची रखडलेली कामेही नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन
भुसावळ – शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजना टप्पा-२ अंतर्गत जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. योजनेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला गती देण्यात येणार आहे.
नवीन जलकुंभामुळे शहरातील पाणी साठवणूक व वितरणाची क्षमता वाढणार असून, नागरिकांना अधिक नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमृत योजना टप्पा-१मधील अपूर्ण कामांबाबतही ठेकेदारांवर कारवाई सुरू असल्याचे सावकारे यांनी सांगितले. दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असून, रखडलेली कामे नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नगरपालिकेतील सत्तापालटानंतर काही काळ योजनेच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, आता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजना मार्गी लावण्यावर भर दिला जात असल्याचे सावकारे यांनी स्पष्ट केले. जलकुंभाचे भूमिपूजन झाल्याने कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आता कामाची गती आणि गुणवत्तेकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.



































