भुसावळ – शहरातील रेल्वे यार्ड परिसरातील गँग हटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १७ हजार रुपयांची रेल्वे मालमत्ता लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास एसएसई/पीडब्ल्यूआय/बीएसएलचे श्री श्याम वाघमारे यांनी भुसावळ यार्डातील गँग हट क्रमांक १४ चे कुलूप तोडण्यात आल्याची माहिती आरपीएफ कार्यालयाला दिली. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आरपीएफचे निरीक्षक सी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली एलएसआयपीएफ विनिता शुक्ला, उपनिरीक्षक सुरेश कुमार गुप्ता, उपनिरीक्षक लालजी यादव तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भुसावळ यार्डातील किमी ४४६/३९ ते ४४७/०१ दरम्यान मुख्य रेल्वे लाईनपासून सुमारे १० मीटर अंतरावर असलेल्या युनिट क्रमांक १४ च्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.
यानंतर एसएसई श्याम वाघमारे व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
तपासादरम्यान गँग हटमध्ये ठेवण्यात आलेली रेल्वे मालमत्ता चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये नट-बोल्टसह १६ हील ब्लॉक, अंदाजे २५६ किलो वजनाचे, किंमत सुमारे ८ हजार रुपये तसेच ३२ डिस्टन्स ब्लॉक, अंदाजे २८८ किलो वजनाचे, किंमत सुमारे ९ हजार रुपये असा एकूण ५४४ किलो वजनाचा व १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समोर आले.
घटनास्थळ परिसरात संशयितांचा शोध घेण्यात आला; मात्र कोणताही संशयित आढळून आला नाही. त्यानंतर उपनिरीक्षक सुरेश गुप्ता यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) कायदा १९६६ चे कलम ३(अ) तसेच रेल्वे कायदा १९८९ चे कलम १४७ अन्वये गुन्हा क्रमांक ०५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आरपीएफ पोस्ट भुसावळ यार्ड येथील महिला उपनिरीक्षक विनिता शुक्ला करीत आहेत.




































