महुडे (राम पाचकाळे) भोर तालुक्यातील बारे खुर्द गावात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील दलित चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ गायकवाड यांचे दि. १५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, अंत्यविधीसाठी मृतदेह घराबाहेर काढल्यानंतर शेजारील पाणंद रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्य शासनाने पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविली असताना, बारे खुर्द येथे मात्र प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी गावच्या सरपंच सविता गायकवाड यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच भूमी अभियंता (भोर) यांच्याकडे वारंवार निवेदने दिली असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावात मृतदेहाची विटंबना होण्याची वेळ आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “वारंवार निवेदने देऊनही अधिकारी दखल घेत नसतील, तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार कसा?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामसेवकाच्या कारभारावर संशय
या प्रकरणात स्थानिक ग्रामसेवकाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सरपंच सविता गायकवाड यांनी संबंधित ग्रामसेवकाने खोटी नोंद करून रस्त्याचे काम नियमित दाखविल्याचा आरोप केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गावातील नागरिकांनी तातडीने अतिक्रमण हटवून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.




































