संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव
भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ओडीसा पोलिसांचे विशेष पथक भुसावळात दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका अपार्टमेंट मालकाची चौकशी करण्यात आली असून संबंधित व्यक्ती ही एका नगरसेवकाचा पुतण्या असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडीसा पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने संबंधित अपार्टमेंट मालकाशी संपर्क साधत संशयित आरोपीबाबत सविस्तर माहिती घेतली. सदरील संशयितावर खंडणी आणि खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले असून, तो काही काळ भुसावळात वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने आणि चौकशीचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागल्याने भुसावळातील एका माजी नगरसेवकाचीही धावपळ सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. “हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन संकटमोचनासाठी” संबंधित माजी नगरसेवकांनी जामनेर येथे जाऊन मा. ना. गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी ओडीसा पोलिसांच्या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, संशयित आरोपीच्या हालचाली, त्याला मिळालेला आश्रय आणि स्थानिक संपर्क याबाबत ओडीसा पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला असून पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




































