भुसावळ उपविभागातील डीबी स्टाफसाठी विशेष कार्यशाळा संपन्न
भुसावळ : गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच क्लिष्ट गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने छडा लावण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हे शोध पथकासाठी (डीबी स्टाफ) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत भुसावळ उपविभाग व मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सध्याच्या डिजिटल युगात गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होत असल्याने पोलीस दलाने तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत आधुनिक तपास तंत्रज्ञानासह पारंपरिक गुप्तवार्ता संकलनाच्या पद्धतींवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत ह्युमन इंटेलिजन्स तंत्रज्ञान, सोर्स क्रिएशन, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, सीडीआर व डम्प डेटा विश्लेषण, सी-ट्रेस व ओसिंट तंत्रज्ञानाचा वापर, तसेच मोड्स ऑपेरांडी ब्युरो (MOB) रेकॉर्डच्या साहाय्याने सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे भुसावळ उपविभागातील गुन्हे शोध पथकाची कार्यक्षमता वाढून आगामी काळात गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




































