घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवक रंगेहाथ जेरबंद
भोर तालुक्यात एसीबीची धडक कारवाई; भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांत संताप
पत्रकार : संतोष मोहिते
भोर : शासनाच्या घरकुल योजनेतील दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडून अटक केल्याची धडक कारवाई मंगळवारी (दि. १९) करण्यात आली. या घटनेमुळे भोर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून शासकीय योजनांवरील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंद व गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांनी एका घरकुल लाभार्थ्याकडून घरकुल योजनेचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार भोलावडे-शिंद मार्गावर ग्रामसेवक सालगुडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून, शासनाच्या जनकल्याणकारी योजनांमध्येही भ्रष्टाचार शिरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. घरकुल योजनेसारख्या सर्वसामान्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये लाच मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी भोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.




































