भुसावळ – शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भुसावळ शहर पोलीस स्टेशनकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना यश मिळाले असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक उद्धव उमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित अमन मनोहर यादव (रा. भुसावळ) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने भुसावळ शहरातून दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून त्यांचा उलगडा करण्यात आला आहे.
आरोपीकडून एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई,भूषण चौधरी, गजानन पाटील तसेच पोलीस नाईक रज्जाक खान यांनी सहभाग घेतला.सदर गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.




































