शाळा सरकारमान्यता प्राप्त आहे की नाही, हे तपासण्यासाठी Unified District Information System for Education (U-DISE) या पोर्टलचा वापर करावा…

पोलीस वार्ता, पुणे : शहर आणि जिल्ह्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शिक्षण चालवले जात असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या तपासणीतून समोर आले आहे. पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात एकूण 51 अनधिकृत शाळा सध्या सुरू असल्याचे समोर आले आहे.
ही धक्कादायक माहिती 2025-26 शैक्षणिक वर्षापूर्वी घेतलेल्या सर्वेक्षणातून समोर आली असून, राज्यभरात एकूण 800 पेक्षा अधिक बोगस शाळा आढळून आल्या आहेत. त्यापैकी किमान 100 शाळा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत.
-
अधिक शाळा तपासणी खाली?
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुणे जिल्ह्यातील बोगस शाळांची खरी संख्या दुप्पट असू शकते. त्यामुळे अजूनही अनेक शाळा तपासणीच्या प्रक्रियेत आहेत.

-
पालकांनी सावध राहावे; अधिकाऱ्यांचे आवाहन!
शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडियासमोर बोलताना सांगितले, ‘राज्यात सुमारे 1,300 शाळांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 800 शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. पुण्यात 51 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असून, पालकांनी अशा शाळांविरोधात समोर येऊन तक्रार करावी.
-
शिक्षण आयुक्तांचा स्पष्ट आदेश!
राज्यातील सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले असून, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे या जिल्ह्यांतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावा लागणार आहे.

-
बोगस शाळांमुळे पालक व विद्यार्थ्यांचे नुकसान?
अनेक पालक मोठ्या अपेक्षेने खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी भरतात. मात्र, जर ही शाळा सरकारमान्यता नसलेली असेल, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येते. त्यामुळे पालकांनी शाळेची पारदर्शकता तपासणे गरजेचे आहे.
-
U-DISE पोर्टलवर शाळेची माहिती उपलब्ध!
शाळा सरकारमान्यता प्राप्त आहे की नाही, हे तपासण्यासाठी Unified District Information System for Education (U-DISE) या पोर्टलचा वापर करावा. या पोर्टलवर शाळेचा नोंदणी क्रमांक, मान्यता, परवाने आदी माहिती सहज उपलब्ध आहे.

PMC हद्दीतील स्थिती :
-
अनधिकृत शाळा : 9
-
अनधिकृत परवानगीचे अर्ज : 5
-
स्थलांतरित अनधिकृत शाळा : 9
पुणे जिल्हा हद्दीतील स्थिती :
-
अनधिकृत शाळा : 8
-
अनधिकृत परवानगीचे अर्ज : 5
-
स्थलांतरित अनधिकृत शाळा : 15

पालकांनी शाळेत प्रवेश देताना याची खात्री करावी?
-
शाळेकडे शासनाचा नॉन-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) आहे का?
-
शाळेला शिक्षण मंडळाची मान्यता आहे का?
-
शाळेकडे राज्य शासनाची परवानगी / Letter of Intent आहे का?




































