वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन; दोन दिवसांनंतरही चौकशी न झाल्याचा दावा
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या (महाजनको) ६६० मेगावॉट प्रकल्पात ड्युटीदरम्यान खासगी कर्मचाऱ्याची प्रकृती अचानक बिघडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचारास विलंब झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
निंभोरा येथील ठेकेदार मनिष सुरवाडे यांच्याकडे काम करणारे झेडआरटीसी परिसरातील रहिवासी अरुण गुळचर हे ६६० मेगावॉट प्रकल्पात ड्युटीसाठी गेले होते. ड्युटीदरम्यान अचानक उलटी होऊन दातखिळी बसल्याने त्यांची प्रकृती बिघडली. घटनेची माहिती मिळताच महिला सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी मॅडम यांनी २१० मेगावॉट प्रकल्पाशी संपर्क साधून तातडीने रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते.
मात्र, रुग्णवाहिका चालक मोहन चौधरी यांनी डॉक्टर जयंत पिंतांबर पाटील यांच्या सूचनेनंतरच वाहन घेऊन जाण्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविण्यास विलंब झाल्याचा आरोप आहे. अखेर दुसरी खासगी रुग्णवाहिका बोलावून अरुण गुळचर यांना भुसावळ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चौकशीचे आश्वासन, मात्र अद्याप कारवाई नाही?
या घटनेबाबत ‘पोलीस वार्ता’चे संपादक निलेश फिरके यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, “याबाबत मला कुठलीही माहिती नाही. मी चौकशी करून कळवितो,” असे त्यांनी सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आश्वासनानंतर दोन दिवस उलटूनही अद्याप चौकशी झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध असताना ती तातडीने का रवाना करण्यात आली नाही, डॉक्टरांची परवानगी घेण्याची आवश्यकता का निर्माण झाली आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत झालेल्या विलंबाची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर अरुण गुळचर यांचा जीव वाचण्याची शक्यता होती का, याचाही वैद्यकीयदृष्ट्या तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव हे संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी याबाबत अधिकृत चौकशी अथवा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे महाजनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, तसेच मृत अरुण गुळचर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.



































