विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा होऊन तीन महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले..

पोलीस वार्ता, पुणे | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कामगार आघाडीची राज्य कार्यकारणीची बैठक रविवार, दि.6 सप्टेंबर 2026 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कामगारांचे संघटन अधिक मजबूत करणे, कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला. विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा होऊन तीन महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच आगामी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सातारा येथून निघणाऱ्या ‘समता क्रांती मार्च’’ नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच कामगार आघाडीचा विस्तार करण्यासोबतच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी दि.27 सप्टेंबर रोजी पुणे शहरात भव्य कामगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून संघटनेची आगामी दिशा निश्चित केली जाणार आहे. यावेळी कामगार नेते अनिल मोरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना अद्याप अटक न झाल्याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी दि.10 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.




































