८.४५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त;
बुर्हाणपूर–जळगाव मार्गावरील अवैध वाहतूक उघड
भुसावळ : राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर भुसावळ तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर केलेल्या या कारवाईत ८ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू तसेच ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोमवारी (दि. १८) रात्री बुर्हाणपूरकडून जळगावकडे प्रतिबंधित मालाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून मिळालेल्या माहितीनुसार, परि. पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत रामदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने साकेगाव शिवारात सापळा रचला.
रात्री सुमारे ११.२० वाजता एमएच-१९-एएक्स-३१२५ क्रमांकाची सिल्वर रंगाची टोयोटा इनोव्हा संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विनालेबलच्या सिलबंद पांढऱ्या रंगाच्या ५ हजार ९९५ पाकिटांमध्ये प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.
वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव किशन इंद्रलाल केसवानी (वय ३९, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे सांगितले. सदर माल मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथून आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
जप्त केलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची एकूण किंमत ८ लाख ४५ हजार ३०० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम ३०(२)(अ), २६(२), २७(३)(डी)(ई) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये किशन केसवानी याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोहेकॉ संजय तायडे, पोहेकॉ संजय भोई, पोहेकॉ वाल्मिक सोनवणे, पोहेकॉ सलीम शेख, पोका जगदीश भोई व मपोका लीना लोखंडे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, प्रतिबंधित मालाचा पुरवठा करणारे व उत्पादक यांच्यापर्यंत तपासाचा विस्तार करून संबंधितांवर एमसीओसीए कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलिस करीत आहेत.



































