भुसावळ / वरणगाव : शहरात नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दोन्ही ठिकाणी बहुमत मिळाल्याने भाजपच्या नेत्यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली आहे. भुसावळ नगरपालिकेचे गटनेतेपदी युवराज लोणारी तर वरणगाव नगरपालिकेचे गटनेतेपदी दिपाली कृष्णा माळी यांची निवड करण्यात आली आहे.
भुसावळ नगरपालिकेत एकूण ५० नगरसेवकांपैकी भाजपचे २७ नगरसेवक निवडून आले असून मित्रपक्ष शिवसेनेचे २ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना मिळून एकूण संख्याबळ २९ झाले आहे. यामुळे युवराज लोणारी यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली.
वरनगाव नगरपालिकेत भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले असून,येथेही दिपाली कृष्णा माळी यांची गटनेतेपदी सर्वानुमते

निवड झाली आहे.दरम्यान,नगराध्यक्षपदी दोन्ही ठिकाणी भाजप विजयी होऊ शकले नाही. भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री भंगाळे तर वरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे,भाजप दोन्ही नगरपालिकांमध्ये गटनेतेपदी मजबूत असूनही नगराध्यक्षपद अन्य पक्षाच्या हातात गेले आहे, जे प्रशासनात सत्ता आणि नेतृत्वाचे मिश्रित स्वरूप दर्शवते. नगरपालिकेच्या निवडीबाबतचे अधिकृत पत्र नगरपालिका निवडणूक प्रभारी व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.






























