अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला..
पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी भारतीय दलित पँथरच्या वतीने स्थानिक शाखा कार्यकर्त्यांना बसण्यासाठी एक बाकडा लावण्यात आला होता. कालांतराने या बाकड्याने एक ऐतिहासिक ओळख निर्माण केली. जो कोणी राजकीय कार्यकर्ता या बाकड्यावर बसेल तो राजकीय जीवनात नगरसेवक आमदार खासदार होतो अशी या बाकड्याची ख्याती निर्माण झाली. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी देवळाली कॅम्प शहरात आल्यानंतर या बाकड्यावर बसल्याशिवाय जात नसत. या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीयमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब. माजीमंत्री गंगाधरजी गाडे, माजीमंत्री अविनाशजी महातेकर साहेब, जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुणजी कांबळे, माजीमंत्री बबनरावजी घोलप, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, हेमंत आप्पा गोडसे यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अनेक आजी माजी नगरसेवक यांच्यासाठी हा बाकडा लकी ठरला आहे.

पण दि.19 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला आहे. पहाटे वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हि बाब येताच या ऐतिहासिक बाकड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला.
देवळाली येथील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने दि.20 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांची भेट घेऊन शहराध्यक्ष पंडितजी साळवे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली व ज्या समाजकंटकाने या बाकड्याची तोडफोड केली त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांना करण्यात आली आहे.





































