दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद
भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह नणंदेला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी अनिल रतन साळुंखे (वय ३८) आणि सुनिता देवराम पवार (वय ४०), दोघेही रा. पांडुरंग टॉकीजसमोर, कुंभारवाडा, भुसावळ, अशी दोषी ठरलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी एक वर्षाची साधी कैद भोगावी लागणार आहे.

या प्रकरणातील मृत महिलेचे नाव उषा अनिल साळुंखे (वय ३२) असे आहे. भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजसमोरील कुंभारवाडा परिसरात २८ जुलै २०१७ रोजी सकाळी ९ ते १०.१५ वाजेदरम्यान हा प्रकार घडला होता.
चारित्र्याच्या संशयातून मारहाण
अभियोक्ता पक्षाच्या प्रकरणानुसार, आरोपी अनिल साळुंखे हा मृत उषा यांचा पती, तर सुनिता पवार ही त्यांची नणंद आहे. उषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत दोन्ही आरोपींनी संगनमताने त्यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर तसेच पोटावर मारहाण केली. या मारहाणीत उषा यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३०/२०१७ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०२ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सेशन्स केस क्रमांक ५८/२०१७ अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
३४ साक्षीदारांपैकी १६ जणांच्या साक्षी
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून २६ ऑक्टोबर २०१७ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. २ जुलै २०१८ रोजी न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. खटल्यात एकूण ३४ साक्षीदार होते. त्यापैकी १६ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांनी काम पाहिले. तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.
न्यायालयाचा आदेश
न्यायालयाने दोन्ही आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५(२) अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०२ सह कलम ३४ अंतर्गत शिक्षेस पात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरविले. त्यानुसार दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी एक वर्षाची साधी कैद भोगावी लागणार आहे.
आरोपी अनिल साळुंखे याने ३० जुलै २०१७ ते ४ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट (सेट-ऑफ) मिळण्यास तो पात्र असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. तसेच आरोपी सुनिता पवार हिने ३० जुलै २०१७ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीत भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट मिळण्यास ती पात्र असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



































