सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भुसावळ : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. अदनान सलीम खान (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अदनान हा बुधवारी (ता. १६) सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास अमरदीप चौक परिसरातून बेपत्ता झाला होता. बराच वेळ तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक, परिचित तसेच पोलिसांच्या मदतीने दिवसभर विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्रीपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
लिफ्टच्या खड्ड्यात चपला आढळल्या
दरम्यान, रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास सुभाष नेहरू चौकीसमोरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरातून अदनानच्या चपला लिफ्टच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तरंगताना दिसल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात पाहणी केली असता पाण्यात अदनानचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे हलविण्यात आला.
सीसीटीव्हीमध्ये बांधकामस्थळाकडे जाताना दिसला
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यात अदनान दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास संबंधित बांधकामाच्या परिसरात जाताना दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो खेळत असताना बांधकामस्थळी गेला असावा आणि तेथे लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदर लिफ्टच्या खड्ड्यात सुमारे आठ फूट पाणी साचले असल्याची माहिती आहे. त्यामुळे बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
बांधकामस्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न
या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील उघडी बांधकामस्थळे आणि तेथील सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लहान मुले किंवा नागरिक प्रवेश करू नयेत यासाठी पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच लिफ्टच्या खड्ड्याभोवती सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक कार्यवाही केली. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.



































