पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..

पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार यंदाही आराध्य दैवत गणरायाच्या शाडू मातीच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त सावकारे यांच्या निवासस्थानी आकर्षक तसेच पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे.

यंदाच्या आरासीत देखाव्यात वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित पैठणी तसेच रेशीम किड्याच्या अंडकोषाचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी ठरत आहे. गणेशमूर्तीची स्थापना विधिवत पूजाविधीने करण्यात आल्यानंतर सावकारे कुटुंबीयांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली. यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी बाप्पाला साकडे घालत, परमेश्वराने आतापर्यंत सर्व काही दिले असून यापुढेही अशीच कृपादृष्टी कायम राहावी, अशी प्रार्थना केली.




































