भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रभारी नगराध्यक्षा तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, त्यांचे न्याय व हक्क, तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती घेण्यात आली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि पात्र कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याबाबतही आढावा घेण्यात आला.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेऊन आढावा बैठका घेण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्कातून तीन नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत त्यांच्या सेवा-सुविधा, हक्क आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा झाली. प्रलंबित प्रश्नांपैकी कोणते प्रश्न तातडीने मार्गी लागतात आणि पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सफाई कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांचे लक्ष लागले आहे.



































