भुसावळ – शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, पीडित तरुणीची आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आश्वासन देत ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघे विवाह करतील, असे सांगितले जात होते.
दरम्यान, मोटारसायकल खरेदीसाठी फिर्यादी व तिच्या आईने ३० जून २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने सुमारे १ लाख १० हजार रुपये दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी लग्नाबाबत विचारणा केल्यावर आदित्यने विवाहास नकार दिल्याचे तसेच फिर्यादीच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आदित्य ब्रजेश वत्स, त्याचे वडील ब्रजेश कुमार सिंह आणि आई सीमा ब्रजेशकुमार सिंह (रा. मेघ मल्हार सोसायटी, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ता.५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



































