भुसावळ : शहरातील शिवाजी नगर पोस्ट ऑफिस परिसरात उभी असलेली जुनी वापरातील ऑटो रिक्षाची इंजिन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कैलास अशोक अग्रवाल (वय 40, रा. भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची एमएच 19 व्ही 1761 क्रमांकाची जुनी ऑटो रिक्षा त्यांच्या घरासमोर उभी होती. दिनांक 4 मे रोजी रात्री 11 वाजेपासून ते 5 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिक्षाचे इंजिन चोरी करून नेले.
सदर चोरीस गेलेल्या इंजिनची किंमत सुमारे 40 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी रिक्षा तपासण्यासाठी गेल्यावर इंजिन आढळून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




































