दोन गुन्ह्यांतील एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा, सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..
पोलीस वार्ता, भुसावळ : सराफ दुकानातून हातचालाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय-38 वर्षे, रा. पापा नगर, खडका रोड, इराणी वस्ती, भुसावळ) असे आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा, सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ तालुका पोलीस ठाणे येथील दाखल गु.र.नं. 129/2026, भा.न्या.सं. कलम 303(2) तसेच बोदवड पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 128/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) या दोन गुन्ह्यांमध्ये सदर आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होता. दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने अकोला येथे रवाना होऊन गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंचनामा करून 32.40 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे 3 लाख 20 हजार रुपये किंमतीची जप्त केली तसेच बोदवड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 15.08 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची जप्त केली. असे कारवाईत एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच पोह. विकास बाविस्कर अधिक तपास करीत आहेत.




























