पुणे, (बालाजी पाटील) हडपसर परिसरात बनावट दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले. यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांनी कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मृत्यूचे खरे कारण लपविण्याचा प्रयत्न झाला का, याची पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बनावट दारूमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.




































