भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देत ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेला सिस्टर पदावरून प्रथमोपचार पदावर पायउतार करण्यात आल्याचीही चर्चा रुग्णालय परिसरात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेला नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिला सेवेत रुजू झाल्यावर वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांनी संगनमत करून तिला सातत्याने त्रास देण्यास सुरुवात केली. “दर महिन्याला रक्कम द्यावी लागेल, अन्यथा नोकरीवरून काढून टाकू”, तसेच “तुझे कागदपत्र बनावट आहेत” अशी धमकी देण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यात आल्याची माहितीही पुढे आली असून त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, “रोज मरे त्याला कोण रडे” या म्हणीप्रमाणे अखेर संबंधित महिलेने आपल्यावरील अन्यायाची माहिती हितचिंतकांकडे व्यक्त केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला. सध्या या संपूर्ण प्रकरणाची रुग्णालय परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून संबंधितांवर कारवाई करीत सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




































