कोरोना योद्धा सिस्टरला वरिष्ठांचा मानसिक छळ; वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थापकांवर गंभीर आरोप
भुसावळ (निलेश.के.फिरके) तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला सिस्टरला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापनाकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेकडून नोकरीवर रुजू झाल्यापासून दरमहा ठराविक रक्कम उकळली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, हा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या कथित दबावाला कंटाळून आर्थिक व्यवहारास नकार दिल्यानंतर १७ मे २०२६ रोजी अचानकपणे प्रथमोपचार विभागाच्या पदावरून पायउतार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामागे वरिष्ठांची मनमानी व दबावाचे राजकारण असल्याचा आरोपही होत आहे.
विशेष म्हणजे, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या महिला ‘कोरोना योद्धा’ला अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याने कर्मचारी वर्गात संताप व्यक्त होत आहे. महाजनको प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.




































