तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई..
पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम सुरू केली आहे. या तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने 17 संबंधित कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी e-POS यंत्राद्वारे व्यवहार करताना कंपनीकडून प्राप्त झालेले Acknowledgement वेळेत स्वीकारले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच e-POS प्रणालीतील साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये तफावत, रोख वह्या व स्टॉक नोंदवहीतील विसंगती, खत वितरणाबाबत आवश्यक नोंदी न ठेवणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली. अशी माहिती परवाना अधिकारी तथा माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.
जिल्ह्यात 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत खत, बियाणे, कीटकनाशक विक्रीशी संबंधित विविध अनियमिततांमुळे एकूण 86 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी सेवा केंद्रांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ठ दर्जाच्या निविष्ठांची विक्री, निर्धारित दरापेक्षा जादा दराने विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शेतकऱ्यांना शासनाचे आवाहन
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल घेणे बंधनकारक असून e-POS यंत्राद्वारेच व्यवहार होत असल्याची खात्री करावी. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमबाह्य व्यवहार, जादा दर आकारणी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या 7821032408 या क्रमांकावर किंवा WhatsApp द्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधिकारी माने यांनी केले आहे.
-
संपर्कासाठी कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण यांचे शासकीय मोबाईल क्रमांक..






























