इफ्तार पार्टीचे आयोजन म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक संबंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे. असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव तीस दिवसाचे उपास पकडतात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो. हिंदू-मुस्लिम-बौद्ध या समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे, या उद्देशाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने दरवर्षी पक्षाच्या वतीने पुढाकार घेत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. यावर्षी 30 मार्च 2025 रोजी देखील रमजान ईदच्या आधी इफ्तार पार्टी करण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष ऍड.शशिकांत उन्हवणे यांनी पक्षाची भुमिका व्यक्त करत हिंदू-मुस्लिम-बौद्ध ऐक्याची गरज आणि त्याचे महत्त्व यावर भाष्य केले. “समाजात सर्व धर्मांनी एकमेकांशी बंधुभावाने वावरले पाहिजे आणि जातीय सलोखा राखला पाहिजे असे सांगत इफ्तारचे आयोजनाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी इफ्तारमध्ये टरबूज, खरबूज, डाळिंब, सफरचंद, चिकू पपई, केळी, अश्या फळांची मेजवानी सजली होती. पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते. हे ऐक्याचे प्रतीक आहे, येथे सर्वधर्मीय लोक प्रेमाने आणि एकोप्याने राहतात. इफ्तार पार्टीचे आयोजन म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक संबंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे. असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात प्रेम आणि बंधुत्व कायम राहील. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि पुढेही असेच उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.







































