भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाभैय्या नत्थू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, जि. बांधा, उत्तर प्रदेश, सध्या मुक्काम सुदर्शन पेपर मिल, ता. भुसावळ) हे घटनास्थळी झोपलेले असताना डंपर क्रमांक एम.एच.१९ झेड ८३८८ चा चालक वाहन रिव्हर्स घेत होता. यावेळी डंपरचे टायर राजाभैय्या यांच्या डाव्या खांद्यावर व मानेवरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर चालकाने कोणालाही माहिती न देता तसेच जखमीस उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून वाहनासह पलायन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज जनार्दन मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ११६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन कनेक्टिव्हिटी बंद असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.



































