तीन हजार रुपये रोख रक्कमेसह विवो, एमआय-10 5 जी आणि रिअलमी 10-प्रो या मोबाईलची चोरी..

पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील उदासी कॉम्प्लेक्स परिसरातील मोबाईल रिपेरिंग दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानातील सुमारे 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश प्रदीप विसे, वय-36 वर्षे, रा. शिवधाम मंदिराजवळ, जळगाव यांचे उदासी कॉम्प्लेक्समध्ये बेंडे हॉटेलजवळ ‘रुद्रा मोबाईल रिपेअरिंग’ या नावाने दुकान आहे. दि.18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कुलूप लावले होते आणि ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी दि.19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटलेले आढळून आले. शटर उघडून आत पाहिले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम तसेच ग्राहकांचे मोबाईल तपासले असता ते चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.




































