भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत शेख अल्तामर गुलशन बेलदार हा तरुण जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयिताने धारदार चाकूने शेख अल्तामर यांच्या पोटावर वार केल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात ते जखमी झाले.
घटनेनंतर जखमी तरुणाला त्याच्या मित्राने तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी वैद्यकीय मेमो देऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे.



































