भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी https://census.gov.in� या संकेतस्थळावर भेट देऊन मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने OTP द्वारे लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करावा. माहिती भरल्यानंतर Reference Number (संदर्भ क्रमांक) प्राप्त होणार असून तो पुढील पडताळणीसाठी आवश्यक राहणार आहे.
स्व-गणनेचे फायदे सांगताना प्रशासनाने नमूद केले की, या प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून नागरिकांना अचूक माहिती स्वतः नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच माहिती अधिक सुरक्षित राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, घर क्रमांक व कुटुंबाची नोंदणी 2026 ते 2027 या कालावधीत केली जाणार आहे. नागरिकांनी दिलेली माहिती अचूक व सत्य स्वरूपात भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच स्व-गणना प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास https://census.gov.in� या संकेतस्थळावरील हेल्पडेस्कचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जनगणना ही केवळ सांख्यिकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.























