भुसावळ, दि. २७ एप्रिल : सोशल मीडियावर लेवा पाटील समाजाविरोधात आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी भोरगाव लेवा पंचायत न्या पाडळसे, भुसावळ विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भुसावळ शहरातील रहिवासी मुकेश गंगाराम गुंजाळ यांनी सोशल मीडियावरील फेसबुकवर एका पोस्टवर केलेली टिप्पणी समाजात तेढ निर्माण करणारी आहे. संबंधित पोस्टमध्ये भुसावळच्या नगराध्यक्षांविषयी उल्लेख करत लेवा पाटील समाजाबद्दल अवमानकारक, अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, या टिप्पण्यांमुळे समाजात गैरसमज पसरून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. “बूट चाटतो”, “लाचार समाज” अशा शब्दप्रयोगांचा वापर करून समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
भुसावळ तालुका अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अशा प्रकारच्या चुकीच्या व भडकावू वक्तव्यांमुळे जातीय तेढ वाढू शकते, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


























