भुसावळ : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच बोदवड पोलिस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) या गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने अकोला येथे रवाना होऊन गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंचांसमक्ष ३२.४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. तसेच बोदवड पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले व परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलिस हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोलिस हवालदार संदिप चव्हाण, चालक पोलिस कॉन्स्टेबल रिजवान शेख तसेच तांत्रिक मदतीसाठी पोलिस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.
अटक आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार विकास यशवंज बाविस्कर करीत आहेत.



































