फैजपूर (प्रतिनिधी): फैजपूर शहरातील हुतात्मा बापू वाणी चौकात शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञात व्यक्तीने फाडफाड करून विटंबना केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास येताच शिवजयंती महोत्सव समिती व नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नसल्याने नगरपालिका व पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. जबाबदारी निश्चित नसल्याने अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. बाजाराचा दिवस असल्याने सुमारे पाच तास मुख्य मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली व मोठी कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक व धार्मिक मान्यवरांनी हस्तक्षेप करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
प्रशासनाने आठ दिवसांत दोषींना अटक करण्याचे आश्वासन दिले असून शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात येईल, असे सांगितले. आंदोलनाचा समारोप शिवआरती, माल्यार्पण व जलाभिषेक करून करण्यात आला.
सध्या शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे. दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.




































