(सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक)
भुसावळ : पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलीस व आरपीएफसह विविध सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सहभागातून मॉकड्रिल घेण्यात आली. अचानक एखादी अनुचित घटना घडल्यास विविध पथके किती तत्परतेने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात, तसेच बचावकार्य आणि पुढील कारवाई किती वेळेत पूर्ण करता येते, याची प्रत्यक्ष रंगीत तालीम या वेळी घेण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ रेल्वे स्थानकावर ही मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती. या कवायतीत लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) अधिकारी व कर्मचारी, जळगाव येथील क्यूआरटी पथक, बीडीडीएस पथक, श्वान पथक, एटीएस पथक, अग्निशमन पथक तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.

मॉकड्रिलदरम्यान रेल्वे स्थानकावर संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्याचे गृहीत धरून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. विविध पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा अंदाज घेत कारवाई केली. यावेळी रेल्वे स्थानकावरून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. बीडीडीएस व श्वान पथकाने संशयास्पद वस्तूंची तपासणी, तर इतर पथकांनी परिसर सुरक्षित करण्याची कार्यवाही केली.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, आरपीएफ, क्यूआरटी, एटीएस, बीडीडीएस, अग्निशमन आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय किती प्रभावी आहे, याचीही या मॉकड्रिलच्या माध्यमातून चाचणी घेण्यात आली. एखादी अनुचित घटना घडल्यास कमीत कमी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ गोविंद पांडव यांनी या मॉकड्रिलमधून देण्यात आला.



































