टेक्निकल हायस्कूलजवळील पंचर दुकानातून संशयित ताब्यात; २ जिवंत काडतुसे हस्तगत
भुसावळ – शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या गस्तीदरम्यान संशयित तरुणाकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आल्याची घटना गुरुवार (दि. ३ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी उघडकीस आली.
पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अंमलदार दीपक शेवरे, राहुल बेनवाल व कुणाल सोनवणे हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी विभागीय पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित गणेश संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) याची टेक्निकल हायस्कूलजवळील पंचर दुकान परिसरात तपासणी करण्यात आली.
अंगझडतीदरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचा कट्टा, एक मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळून आला. यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय पवन नायमाने करीत आहेत.



































