भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रविवारी (ता. १६) गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्स्प्रेस येत असताना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ हवालदार लोकेश्वर यादव यांनी खांद्यावर पांढरी प्लास्टिकची पिशवी घेऊन जाणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पिशवीत गांजा असल्याचे त्याने सांगितले.
संशयित व्यक्ती व पिशवी आरपीएफ पोस्ट, भुसावळ येथे आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्तव्यावरील श्वान ‘वीरू’ याच्या सहाय्याने पिशवीची तपासणी केली असता त्यात मादक पदार्थ असल्याची पुष्टी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर एएसआय महिलाल सिंग यांनी सीटी कपिल कुमार, सीआयबी भुसावळ, जीआरपी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकारी जितेंद्र सिंग, एएससी/आरपीएफ भुसावळ यांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा केला.
पिशवीतून गांजाची दहा बंडले जप्त करण्यात आली. त्यांचे एकूण वजन १९.९५९ किलो असून अंदाजे किंमत ९ लाख ९७ हजार ९५० रुपये आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संशयित आरोपी व जप्त गांजा जीआरपी भुसावळच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी जीआरपी भुसावळने सोमवारी (ता. १७) सकाळी सहा वाजता एसीआर क्रमांक ६०८/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ व २०(ब)II(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास भुसावळ जीआरपीचे पीएसआय प्रवीण निकाळजे करीत आहेत.



































