खासगी इसामामार्फत २० हजारांची मागणी केल्याचा ठपका; प्राथमिक व विभागीय चौकशी होणार
भुसावळ : आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार महेश एकनाथ चौधरी (पोहेकाँ १५३९) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मागणी पडताळणीत गंभीर बाबी निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ३० सप्टेंबर रोजी निलंबनाचे आदेश काढले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष केलेल्या मागणी पडताळणीत महेश चौधरी यांच्याविरुद्ध गंभीर बाबी समोर आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १३९/२०२६ मधील आरोपीस अटक न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे संभाषणातून निष्पन्न झाल्याचे आदेशात म्हटले आहे.
ही रक्कम महेश चौधरी यांच्यासाठीच मागण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे नमूद आहे. प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली नसली, तरी मागणी पडताळणी, पंचांचे कथन, तक्रारदाराचा जबाब तसेच डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरवरील ध्वनिमुद्रित संभाषण आदी पुरावे उपलब्ध असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खासगी इसमाविरुद्धही गुन्हा…
या प्रकरणात खासगी इसम अमन सनसोये याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७अ अन्वये भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी इसामामार्फत लाचेची मागणी केल्याच्या आरोपामुळे पोलिस हवालदार चौधरी यांच्या वर्तनाची विभागीय पातळीवरही दखल घेण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, चौधरी यांचे वर्तन बेजबाबदार व बेशिस्त स्वरूपाचे असून, त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा जनमानसात डागाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. वरिष्ठांच्या सूचना व आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. जबाबदार पोलिस अंमलदार असताना खासगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी करणे हे गंभीर बेशिस्त वर्तन असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याचे आदेशात नमूद आहे.
जळगाव पोलिस मुख्यालयात हजेरी…
महाराष्ट्र पोलिस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील तरतुदीनुसार महेश चौधरी यांना प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी व त्यानुषंगाने होणाऱ्या कारवाईच्या अधीन राहून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव पोलिस मुख्यालय राहणार आहे. सर्व शासकीय किट-संरंजाम तेथे जमा करावा लागणार असून, पोलिस अधीक्षकांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी राखीव पोलिस निरीक्षक, जळगाव पोलिस मुख्यालय यांच्याकडे हजेरी द्यावी लागणार आहे.
निलंबन कालावधीत नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. मात्र, या काळात कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास ती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम १६ नुसार गैरवर्तणूक मानली जाऊन शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, तसेच अनुज्ञेय निर्वाह भत्ताही गमवावा लागू शकतो.
या प्रकरणी आता प्राथमिक चौकशी तसेच विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू होणार आहे.



































