पूर्ववैमनस्यातून साकेगावात दोघांवर चाकू हल्ला ; भुसावळातील संशयितांचा शोध सुरू
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे पूर्ववैमनस्यातून तसेच मुलीच्या कारणावरून दोन तरुणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २९) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राहुल कोळी व प्रवीण वाघ हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर भुसावळ येथील गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, राहुल कोळी व प्रवीण वाघ यांच्याशी पूर्वीपासून काही कारणावरून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुलीच्या कारणावरून भुसावळ येथील काही तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयितांनी दोघांवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी प्रशांत देरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, तालुका पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचे पथक विविध ठिकाणी तपास करीत असून, हल्ल्यामागील नेमके कारण तसेच घटनेतील संशयितांची भूमिका तपासली जात आहे.
दरम्यान, जखमी राहुल कोळी व प्रवीण वाघ यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असून, तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. जखमींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, त्यांच्या जबाबानंतर घटनेबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी रात्री तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.



































