दोन संशयित ताब्यात; गुन्हे शोध पथकाची कारवाई
भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली अँपे रिक्षा अवघ्या काही दिवसांत शोधून काढण्यात बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ता. १५ रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शहर परिसरातून अँपे रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू करत गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती तसेच गोपनीय सूत्रांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
पोलिसांनी चोरीस गेलेली अँपे रिक्षा हस्तगत केली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.




































