सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई; ५० हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त
रावेर : ( विनायक जहुरे ) शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून रोकड व सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. रितेश रविंद्र नेवे (वय ३१, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्यामागे, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. मामुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, जळगाव; सध्या रा. सिल्वासा, जि. नगर हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रावेर पोलिस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिला या अंगणवाडी सेविका असून, त्या ११ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त अहिरवाडी येथे गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला.
घरातील मौल्यवान वस्तू तपासल्या असता ५० हजार रुपये रोकड, दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने रावेर शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. दिवसा चोरी झाल्याने तपासात काही अडथळे येत असतानाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना २१ सप्टेंबर रोजी अटक केली.
नात्यातील व्यक्तीच आरोपी
पोलिसांनी केलेल्या चौकशीत रितेश नेवे हा फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी व त्यांच्या बहिणीचा मागील काही वर्षांपासून संपर्क नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी महिला घरात एकट्याच राहत असल्याची माहिती असल्याचा फायदा घेत रितेश नेवे याने मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे.
रोकड व सोन्याचे दागिने जप्त
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली. या कालावधीत आरोपींकडून गुन्ह्यातील ५० हजार रुपये रोकड आणि सुमारे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात रावेर गुन्हे शोध पथकाला यश आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी व विकार शेख यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.



































