भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगूर शहर परिसरातील महावितरणाच्या कामांचा आढावा मंगळवारी पोलीस वार्ताने घेतला. यावेळी महावितरण सहाय्यक अभियंता भगूर शहर कक्ष कार्यालय यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.
यावेळी सहा. अभियंता यांच्याकडून माहिती देण्यात आली की, 15 ऑगस्ट 2026 पासून प्रामुख्याने शहरातील उपकेंद्र सक्षमीकरण केले गेले आहे. त्यात चार ते पाच रेले बदलले असून, धामणगाव येथे नवीन ब्रेकर बसवले आहे. एसीडीसी समस्या मार्गी लावल्या आहेत. तसेच भगुर शहरातील आहुजा कॉम्प्लेक्स, खैरनार परिसरातील एबी स्वीच व सर्व आवश्यक तांत्रिक कामे मार्गी लावले आहेत. सैनिक सोसायटी, रेणुका नगर, स्वामी समर्थ, रोहित्राचे सर्व संचालन व सुविधा व्यवस्थित केल्या आहेत. तसेच तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी विज संदर्भात काहीही अडचण आल्यास त्यांना संपर्क साधावा.
पुढे त्यांनी सांगितले, शहरातून जाणारा रेल्वे ब्रिज तयार होत असून तेथून वीज वाहिनी जात असल्याने तो प्रश्न देखील मार्गी लावला गेला आहे. त्या ठिकाणच्या विज वाहिनी हटवून तो परीसर मोकळा करून दिला आहे. तसेच भगुर नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बलकवडे यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव व महापुरुषांच्या मिरवणूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वीज वाहिनी या वरती केल्या गेल्या आहेत. भूमिगत केबलची देखील कामे मार्गी लावून भगुर शहरात यापुढेही नागरीकांना तत्पर व चांगल्या प्रकारे महावितरणाच्या सेवा पुरवणार. अशी सर्व माहिती सहा. अभियंता श्री. सुरेश पाचंगे यांनी दिली आहे.




































